
चार्ली चॅपलिन या विनोदवीराचे प्रेरणादायी चरित्र
लहानपणी माझं अवांतर वाचन तसं मर्यादितच होतं. पण पुलंची काही पुस्तकं मात्र एवढी भावली की त्यांच्या शब्दांनी माझ्या मनात कायमचं घर केलं. पुलं माझे आवडते लेखक झाले, आणि त्यांच्या आवडत्या कलाकारात मीही गुंतलो – तो म्हणजे चार्ली चॅपलिन. पुलंच्या लेखांतून, भाषणांतून वारंवार दिसणाऱ्या चॅपलिनच्या उल्लेखामुळे माझ्या मनात या कलाकाराबद्दल अपार कुतूहल निर्माण झालं. आणि जेव्हा ‘हसरे दुःख’ हे त्याचं चरित्र हाती आलं, तेव्हा ते वाचल्याशिवाय राहवलं नाही.
“चार्लीचे डोळे हसतात, पण त्यात एक अनामिक करुणा दडलेली असते. तो हसवतो, पण त्याच्या हसण्यामागे एक वेदना असते.” – पु. ल. देशपांडे
चार्लीचं चरित्र वाचताना जाणवतं – माणसाने कितीही कठीण प्रसंगांना सामोरं गेलं तरी धैर्य, संस्कार आणि संयम न सोडता लढा दिला, तर त्याचं कर्तुत्व असामान्य ठरतं. आणि अशा जीवनकहाण्या नकळत आपल्याला प्रेरणेचा मोठा खजिना देऊन जातात.
‘हसरे दुःख’ ही एका थोर कलाकाराची जीवनकहाणी तर आहेच, पण त्याचबरोबर जिद्द, तत्त्वनिष्ठा, संवेदनशीलता आणि कलेवरील अखंड प्रेम यांच्या जोरावर विपरीत परिस्थितीला हरवणाऱ्या एका योद्ध्याचीही गाथा आहे.
हालाखीचं बालपण
चार्लीची आई – हेना चॅपलिन – रंगभूमीवरील एक उत्तम कलाकार. पण एका शोदरम्यान अचानक तिचा आवाज हरवतो. विंगेतून हा प्रसंग पाहणारा पाच वर्षांचा चार्ली स्टेजवर धावतो, आईचा शो पुढे नेतो आणि प्रेक्षकांची दादही मिळवतो. पण त्या दिवसापासून चॅपलिन कुटुंबावर काळाचा डोंगर कोसळतो. आईचा आवाज गेल्याने नोकरी थांबते, वडिलांच्या दारूच्या व्यसनामुळे घर दारिद्र्यात बुडतं. आईला दोन वेळचं जेवण द्यायलाही अशक्य होतं, पण तरीही ती मुलांवर उत्तम संस्कार करते – जे चार्ली आयुष्यभर जपतो.
लहानपणच्या या दुःखछायांनी चार्लीच्या मनावर कायमचा ठसा उमटवला. म्हणूनच त्याच्या विनोदात हसण्याबरोबरच वेदनेची हलकीशी किनार नेहमीच दिसते.
झंझावाती कारकीर्द
नाटकातून सुरुवात करून, अमेरिकेत पोहोचल्यावर चित्रपटांत संधी मिळताच चार्लीचं आयुष्य बदललं. जन्मतःच प्रतिभावंत असलेल्या या कलाकाराला यश, प्रसिद्धी आणि संपत्ती वेगाने लाभते. तरीही त्याची खरी प्रेरणा पैशातून नव्हे, तर कलेवरील निखळ प्रेमातून मिळत असते. नवनवीन कल्पना, तंत्र आणि शैली शोधण्यात त्याचं संपूर्ण आयुष्य गुंतून जातं.
लहानपणच्या यातना त्याच्यासाठी अनेक कथानकांच्या स्रोत बनल्या. त्यातूनच असंख्य हृदयस्पर्शी आणि विनोदी कलाकृती जन्माला आल्या.
संघर्षाची कायमची साथ
चार्लीने कल्पनेच्या पलीकडचं यश मिळवलं, पण वैयक्तिक आयुष्यात मात्र त्याला शांतता फार कमी मिळाली. संसार वारंवार मोडला, तरी प्रत्येक वेळी नियतीशी झुंज देत त्याने यश पुन्हा ओढून आणलं.
राजकारणी, पत्रकार आणि कलाक्षेत्रातील लोकांनी त्याची शेवटी हेळसांड केली. पण तो धीरोदात्तपणे प्रत्येक आघाताला सामोरं गेला.
लोकांना हसवण्याचा ध्यास
जीवनभर दुःखाची अनेक रूपं पाहिलेला हा संवेदनशील कलाकार लोकांना हसवण्याच्या ध्यासाने झपाटलेला होता. त्याचा विनोद कधीही उथळ नव्हता – तो शालीन होता, समाजातील व्यंगांवर हलक्याशा स्मितातून बोट ठेवणारा होता. हसवत असताना नकळत डोळ्यात पाणी आणणारा होता.
दोन वेळचं अन्न मिळेल का याचीही खात्री नसलेल्या बालपणातून उठून, त्याने आपल्या कलाकृतीतून हिटलरचाही सामना केला – आणि त्यात यशस्वी ठरला.
अतिशय हालाखीतून उभं राहून संपूर्ण जगाला हसवणाऱ्या चार्ली चॅपलिनची जीवनगाथा मला प्रचंड प्रेरणा देऊन गेली. मला खात्री आहे, तुम्हालाही ती नक्की भावेल.
पुस्तकाबद्दल
चार्ली चॅपलिनचा हा जीवनपट साध्या, सोप्या पण तरीही अत्यंत सखोल भाषेत मांडलेला आहे. हे पुस्तक वाचायला मला जवळपास वीस ते बावीस तास लागले, पण त्यातला एकही क्षण कंटाळवाणा वाटला नाही.
प्रसंगांच्या रोमांचकतेमुळे वेळेचं भान राहत नाही.
जगाला आयुष्यभर हसवणाऱ्या या महान कलाकाराची जीवनकहाणीही आपल्याला छान हसवते, मनाला भिडते आणि नकळत अनेक प्रेरणा देऊन जाते.
लेखक भा. द. खेर (From Wikipedia)
(जन्म : कर्जत, अहमदनगर जिल्हा – १२ जून १९१७; निधन : पुणे – २१ जून २०१२)
भा. द. खेर हे मराठीतील एक बहुगुणी आणि प्रख्यात लेखक होते. बी.ए., एल्एल.बी. ही शैक्षणिक पदवी घेतल्यानंतर त्यांनी पत्रकारितेत पदार्पण केले. तब्बल पंचवीस वर्षे त्यांनी केसरी या अग्रगण्य दैनिकात उपसंपादक म्हणून काम केले. त्याआधी अग्रणी, हिंदुराष्ट्र, भारत या वृत्तपत्रांत त्यांनी लेखन व संपादन केले. काही काळ वसंतराव काणे यांच्या रोहिणी मासिकाचे संपादनही त्यांनी केले, तर सह्याद्री मासिकाचे ते दहा वर्षे संपादक होते. विशेष म्हणजे, ते मराठीतील नामवंत साहित्यिक वि. स. खांडेकर यांचे मामेभाऊ होत.
इ.स. १९४१ ते १९८४ या काळात भा. द. खेर यांनी विपुल आणि दर्जेदार साहित्यनिर्मिती केली. मनोहर माळगावकरांच्या अधांतरी व द प्रिन्सेस या कादंबऱ्यांचे त्यांनी केलेले अनुवाद विशेष गाजले. त्याचप्रमाणे शेक्सपियरची हॅम्लेट, किंग लियर, विंटर्स टेल ही नाटके त्यांनी मराठीत आणली. लोकमान्य टिळक आणि स्वातंत्र्यवीर सावरकर यांच्या साहित्याची ओळख करून देणारे ग्रंथ, श्री गुलाबराव महाराज, गजानन महाराज, साईबाबा यांच्यावर लिहिलेली चरित्रग्रंथे, ऐतिहासिक गुजगोष्टी, नाना नवलकथा अशी विविधांगी लेखनकृती त्यांनी साकारली.
त्यांची ११७ पुस्तके प्रसिद्ध झाली असून त्यांच्या लेखनाची एकूण पृष्ठसंख्या २५,००० पेक्षा अधिक आहे – हे त्यांच्या साहित्यसंपदेचं मोठं द्योतक आहे. समग्र लोकमान्य टिळक या सप्तखंडी ग्रंथाचे ते सहसंपादक होते.
कथा, कादंबरी, नाटक, प्रवासवर्णन, निबंध, चरित्र, चरित्रात्मक कादंबरी, कुमार वाङ्मय आणि संतचरित्रे – अशा जवळपास सर्वच वाङ्मयप्रकारांत खेर यांनी मोलाची भर घातली. त्यांच्या लेखणीतून जन्माला आलेल्या साहित्यामुळे मराठी वाचक समृद्ध झाले.
मला आवडलेली काही वाक्य
“गरिबी ही खूप वाईट गोष्ट आहे, गरिबीत अनेक वाईट गोष्टीही चांगल्या वाटायला लागतात.”
“परंतु माणसाला सतत आनंदी वातावरणात थोडचं राहता येत असतं. आनंदाच्या पाठीला कर्तव्य आणि व्यवहार या दोन्ही गोष्टी लागलेल्याच असतात.”
“सिनेमाची फिल्म जशी उलटी फिरवता येते, तशी आयुष्याची नाही फिरवता येत.”
“माझ्या आयुष्यात जे दुःख आले, तेच माझ्या कलेचा आधार बनले.”
“खरे सौंदर्य हे चेहऱ्यावर नाही, तर हसऱ्या मुखवट्यामागे दडलेल्या दुःखात असते.”
“माणसाने कितीही मोठा संघर्ष केला तरी, हसण्याची ताकद कधीही सोडू नये.”
“माझी कला ही केवळ मनोरंजनासाठी नाही, तर जीवनातील सत्याला आरसा दाखवण्यासाठी आहे.”
पुस्तक विकत घेण्यासाठी
हे पुस्तक इंटरनेटवर अनेक ठिकाणी उपलब्ध आहे. काही लिंक्स मी येथे देत आहे.
- Amazon – https://www.amazon.in/Hasre-Dukkha-B-D-Kher/dp/8174341196
- Flipkart – https://www.flipkart.com/hasare-dukh/p/itmfb2b4bf9f0325
- Akshardhara – https://akshardhara.com/products/9788174346919-hasare-dukkha
- Mehta – https://mehtabookseller.com/products/hasare-dukh-by-b-d-kher
- Majestic – https://www.majesticreaders.com/book/519/hasare-dukkha-b-d-kher-rajhans-prakashan-buy-marathi-books-online-at-majesticreaders-8174341196
- Storytel (Audio version) – https://www.storytel.com/in/books/hasare-dukkha-926864?utm_source=internal&utm_medium=app_link&utm_campaign=share_links
दादा,
चार्ली चॅपलिनच्या आयुष्यातील महत्त्वाचे टप्पे, त्यांचे बालपण, आईचा संघर्ष, वडिलांचे व्यसन, आणि यातून चार्लीच्या व्यक्तिमत्त्वाला व कलेला मिळालेली दिशा, हे सर्व अत्यंत प्रभावीपणे मांडले आहे. विशेषतः, ‘हालाखीचं बालपण’ आणि ‘संघर्षाची कायमची साथ’ या भागांतून चार्लीच्या जीवनातील खडतर प्रवास अगदी स्पष्ट दिसतो. त्यातूनच त्याच्या विनोदाला मिळणारी वेदनेची किनार, जी तुम्ही नमूद केली आहे, ती वाचकाच्या मनात खोलवर रुजते.
चार्लीने कल्पनेच्या पलीकडचे यश मिळवले असले तरी, वैयक्तिक आयुष्यातील त्याचे संघर्ष आणि तरीही लोकांना हसवण्याचा ध्यास, हे मुद्दे तुम्ही इतक्या प्रभावीपणे मांडले आहेत की, केवळ तो एक महान कलाकार नव्हता, तर एक अदम्य योद्धा होता हे पटते. हिटलरलाही आपल्या कलेतून आव्हान देण्याची त्याची हिंमत, हे त्याच्या चारित्र्याचे एक मोठे वैशिष्ट्य तुम्ही अधोरेखित केले आहे.
भा. द. खेर यांच्या लेखनाबद्दल आणि त्यांच्या साहित्यिक योगदानाबद्दलची माहिती देऊन तुम्ही या पुस्तक परिचयाला एक वेगळी उंची दिली आहे. खेर यांचे विविध साहित्य प्रकारातील योगदान, विशेषतः ‘केसरी’ आणि ‘सह्याद्री’ मासिकांमधील त्यांचे कार्य, हे सर्व वाचकांना त्यांच्याबद्दल अधिक जाणून घेण्यास प्रवृत्त करेल. त्यांनी अनुवादित केलेली नाटके आणि त्यांची एकूण ११७ पुस्तके, हे त्यांच्या प्रचंड साहित्यसेवेचे द्योतक आहे.
तुमच्या लेखनातून चार्ली चॅपलिनच्या जीवनाचे सार आणि भा. द. खेर यांच्या लेखणीचे सामर्थ्य, दोन्ही उत्तम प्रकारे समोर येते. शेवटी तुम्ही उद्धृत केलेली वाक्ये तर मनाला भिडणारी आहेत. “माझ्या आयुष्यात जे दुःख आले, तेच माझ्या कलेचा आधार बनले” किंवा “खरे सौंदर्य हे चेहऱ्यावर नाही, तर हसऱ्या मुखवट्यामागे दडलेल्या दुःखात असते” ही वाक्ये चार्लीच्या संपूर्ण आयुष्याचे आणि त्याच्या कलेचे तत्त्वज्ञान स्पष्ट करतात.
हा लेख केवळ एका पुस्तकाचा परिचय नाही, तर एका महान कलाकाराच्या प्रेरणादायी जीवनाचा आणि एका कसलेल्या लेखकाच्या शब्दांचा आरसा आहे. तो वाचकाला केवळ माहिती देत नाही, तर त्याला अंतर्मुख होऊन विचार करायला लावतो. खरोखरच, हा एक हृदयस्पर्शी आणि विचारप्रवर्तक लेख आहे. वाचकाला नक्कीच ‘हसरे दुःख’ हे पुस्तक वाचण्याची इच्छा होईल याची मला खात्री आहे. स्व. चंदनशिव मॅडम यांच्या कडून आपल्या शाळेच्या ग्रंथालयातून हे पुस्तक मागवल्याच आठवत पण कुणीतरी वाचकांने वाचायला नेल होत त्यामुळे मला ते मिळालं नव्हतं. नंतर StoryTell वर मी Audio Book ऐकलं होतं. तुमच्या या पुस्तक परिचयाच्या निमित्ताने या पितृपक्षात चंदनशिव मॅडम यांच्याही स्मृतींना उजाळा मिळाला. शुभेच्छा.
आपल्या या प्रतिसादाबद्दल मनःपूर्वक आभार. खरचं चार्ली चॅपलिन चं आयुष्य खूप प्रेरणादायी आहे. आणि तुम्ही म्हणाल्याप्रमाणे storytel वर हे पुस्तक ऐकण्यातही खूप मजा येते. Thanks once again.
मनापासून धन्यवाद डॉ अमित
मला आवडलेली वाक्य वाचली आणि पुस्तक वाचण्याची जिज्ञासा निर्माण झाली . दिलेल्या लिंक वरून मी पुस्तक मागविले . खूप खूप धन्यवाद
आणि शुभेच्छा
आपले मनापासून आभार. आशा करतो की आपल्याला पुस्तकही खूप आवडेल.
अत्यंत सुंदर आत्मचरित्र आहे…. मी खूप वर्षापूर्वी वाचले होते…
दुःख आणि हसू हे विरोधाभासी असले तरी एकमेकांतून जन्म घेतात….
अगदी खरंय. मनापासून धन्यवाद!